Kishori Pednekar News: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने समन्स बजावले आहे. COVID-19 महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावले आहे. ईडीचा दावा आहे की, एक कंपनी जी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला 2000 रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तब्बल 6,800 रुपयांना विकत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेले टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने दिले जात होते. पेडणेकर या सध्या शिवसेना (UBT) गटाच्या नेत्या आहेत.
मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
कोविड डेड बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पालिकेचे केंद्रीय खरेदी विभागाचे (CPD) माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांना मृत कोविड-19 रूग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करताना झालेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समन्स धाडले होते. त्यानुसार ते चौकशीला सामोरेही गेले होते. EOW द्वारा शिवसेना (UBT) नेत्या आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसी (BMC) च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 120 (बी) (गुन्हेगारी कट) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
कथीररित्या बॅग घोटाळा झाल्याचा आरोप
कोरोना महामारी काळात उद्भवलेल्या भयंकर परिस्थीती दरम्यान मुंबई महापालिकेकडून आरोग्य सुविधांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये मृत कोरोना रुग्णांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग, मास्क आणि इतर वस्तूंमध्ये निधीचा गैरवापर केला गेला. त्यांच्या खरेदीतही अनियमितता झाल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर या नोव्हेंबर 2019 ते 2022 या काळात मुंबईच्या महापौर राहिल्या आहेत.
अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
किशोरी पेडणेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी हे प्रकरण खोटे असून त्यात आपणास मुद्दाम गोवले असल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय असे की, किशोरी पेडणेकर यांच्यावर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी केवळ आरोप केले जात असत. त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यानेच दबाव टाकण्याच्या हेतूने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यातआल्याचा दावा करण्यात येत आहे.
एक्स पोस्ट
Maharashtra | ED has summoned former Mumbai Mayor Kishori Pednekar for questioning today in connection with Covid body bag scam case
"I will appear before the agency, " says Kishori Pednekar
— ANI (@ANI) November 8, 2023
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने बीएमसी कोविड -19 केंद्र घोटाळ्या संदर्भात मुंबईतील 15 ठिकाणी छापेमारी केली . ज्यात अधिकाऱ्यांनी 68.65 लाख रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मनी लॉंडरींग विरोधात असलेल्या या एजन्सीने राज्यातील विविध ठिकाणी 50 पेक्षाही अधिक ठिकाणी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. ज्यांचे बाजारमुल्य जवळपास 150 कोटींच्या आसपास आहे. शिवया मुदत ठेी आणि 15 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2.46 लाख रुपयांचे दागिणेही जप्त करण्यात आले आहेत. ईडीने अनेक गुन्हेगारी कागपत्रे आणि अनेक मोबाईल फोन, लॅपटॉपही जप्त केल्याचे समजते.