Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोट्यावधींची संपत्ती ईडी (ED) कडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने ही कारवाई केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए (PMLA) अंतर्गत अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4.20 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली ही अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता आहे. (Money Laundering Case मध्ये ईडी कारवाई विरूद्ध Anil Deshmukh सर्वोच्च न्यायालयात)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदही सोडावे लागले होते. तसंच ईडी आणि सीबीआयचे धाडसत्रही अनिल देशमुख यांच्या घरी सुरु होते. त्याचबरोबर चौकशीसाठी ईडीकडून समन्सही बजावण्यात आला होता.

ED Tweet:

परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि सचिन वाझे प्रकरणातून एक नवे प्रकरण समोर आले. यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण गाजल्यानंतर मुंबई हायकोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावले असेल तरी कायदेशीर कारवाई त्यांना टाळता आली नाही. यापूर्वी अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती.

दरम्यान, हे सर्व सूडाचे राजकारण असल्याचे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार म्हटले आहे. तसंच अनिल देशमुख प्रकरणाचा कोणताही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असे संजय राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.