Maharashtra Police (Photo Credits: Twitter/ ANI)

Lockdown: लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 12 हजार 725 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 हजार 753 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या 1317 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 69 हजार 435 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माहिती दिली आहे.

याशिवाय लॉकडाऊन काळात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 15 हजार 591 पास वितरित करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत एकूण 4 लाख 97 हजार 705 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच क्वारंटाईन चा शिक्का असलेल्या 680 व्यक्तींना शोधून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. (वाचा - उपासमारीमुळे त्याने खाल्लं रस्त्यावर पडलेल्या मृत जनावराचं मांस; पहा मन हेलावून टाकणारा व्हायरल व्हिडिओ)

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी राज्यात 1680 रिलिफ कॅम्प उभारण्यात आले असून यात जवळपास 1 लाख 16 हजार 717 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस 24 तास कार्यरत आहेत. कोरोना विरुद्ध लढा देताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 133 पोलीस अधिकारी आणि ९९१ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मुंबई 11, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 1, एटीएस 1, ठाणे शहर 1 अशा 18 पोलीसवीरांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाज कंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर विभागाने 409 गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी 218 जणांना अटक करण्यात आली आहे. यात आक्षेपार्ह WhatsApp मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी 172 गुन्हे, Facebook पोस्ट्स शेअर 163, Tiktok व्हिडिओ शेअर 19, Twitter द्वारे आक्षेपार्ह ट्विट 7, Instagram द्वारे चुकीच्या पोस्ट 4, अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.