
(Nashik Currency Note Press) मध्ये भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली आहे. या भरती प्रक्रियेच्या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून डमी परीक्षार्थी बसवल्याची आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या यामध्ये पवई पोलिस स्टेशन मध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही आरोपी मूळचे बिहारचे असल्याचं समोर आलं आहे.
करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा/इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक या पदांसाठी परीक्षा झाली होती. यामध्ये सात जणांनी डमी परीक्षार्थींना पेपर लिहण्यास पाठवले होते. डमी परीक्षार्थी पेपर लिहून आले आणि ते पास देखील झाले. दरम्यान परीक्षा पास झाल्यानंतर आरोपींनी बनावट आयटीआय प्रमाणपत्र आणि डिप्लोमा केल्याची बनावट कागदपत्र देऊन नोकरी मिळवली. फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर प्रकरण झिरो एफआयआरच्या स्वरूपात मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
पवई पोलिसांनी या फसवणूकीच्या प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्याचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा किंवा रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरु आहे.
रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार (दुसरा आरोपी), आशुतोष कुमार अशी सात आरोपींची नावं असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे.