Peacocks | (Photo Credits-pexels

Drought in Maharashtra: दुष्काळाच्या झळांनी अवघा महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. उन्हाच्या काहीलीत शेतकरी, जनता होरपळून निघत आहे. इतकेच नव्हे तर, वाढत्या उन्हाचा आणि दुष्काळाचा तडाखा शेत, माळराण, डोंगर दरऱ्यांमध्ये निवास करणाऱ्या पशू-पक्षांनाही बसू लागला आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अन्न-पाण्याच्या टंचाईचा मोठा तडाखा नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या दहीवड-दीघवड (Dahiwad-Digghavad) गाव परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मोरांना बसला. या परिसरात अन्न आणि पाणी न मिळाल्याने व्याकूळ झालेले तब्बल 40 मोर मृत्युमुखी (Peacocks Died) पडले. मोर (Peacocks) वाचण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थिचे प्रयत्न केले. मोरांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी पाण्याचे साठेही ठेवले. मात्र, वन विभागाने आवश्यक ती काळजी न घेतल्यानेच मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील चांदवड या मुख्य गाव परिसरता असणाऱ्या दहीवड-दीघवड गाव हद्दीत 40 हून अधिक मोर मृत अवस्थेत आढळले. गेले काही दिवस हे मोर अन्न आणि पाणी न मिळाल्याने व्याकूळ होते. हे मोर अन्नाच्या शोधात नागरी वस्त्यांमध्येही येत होते. मोरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला वनविभागाचा हलगर्जीपणाच नडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या मोरांना जर वेळेतच अन्न आणि पाणी मिळाले असते तर कदाचित मोरांचे प्राण वाचू शकले असते असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही गावकऱ्यांनी एक वेगळेच आणि तितकेच धक्कादायकही निरिक्षण नोंदवले आहे. काही गावकऱ्यांच्या मते दहिवड व दीघवत परिसरातील काही लोकांचे पोल्ट्री फार्म आहेत. दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेमुळे या फार्ममधील कोंबड्या मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडतात. या कोंबड्या हे लोक गाव हद्दीच्या जंगलात टाकतात. या कोंबड्यांचे मांस खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाला. आता मृत झालेल्या मोरांचे मांस गावातील मोकाट कुत्र्यांनीही खाल्ले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो अशी भीतीही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.