मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात कमी पावसामुळे केवळ 42 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध; BMC ने नागरिकांना केले 'हे' आवाहन
Water Supply | Representational Image | (Photo Credit: Facebooki)

Drinking Water Supply In Mumbai: मुंबईला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणे यांचा पाणीसाठा केवळ 42 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. जूनमध्ये फक्त आठ दिवस शिल्लक असतानाही पाण्याच्या साठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही, त्यामुळे येत्या महिन्याभरात पाऊस पुरेसा न झाल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. मात्र पुढील महिन्यात पाऊस सरासरीच्या 100% होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे बृहन्मुंबई महानगर पालिके तर्फे सांगण्यात आले आहे. रविवारच्या अहवालानुसार, मोडक सागरमध्ये 25% पाणीसाठा उपलब्ध आहे, तानसामध्ये 11.37%, मध्यम वैतरणा 14.23%, भातसा 9.72%, विहार 22.27% आणि तुळशीमध्ये 30.64% उपयुक्त पाणी पातळी आहे.  IMD Monsoon 2020 Forecast: यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज.

प्राप्त माहितीनुसार, पाण्याच्या साठ्याबाबात माहिती देताना अतिरिक्त नगरपालिका आयुक्त (हायड्रॉलिक विभाग) पी. वेलरासू यांनी सांगितले की, “यावर्षी हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत मुबलक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आतापर्यंत अप्पर वैतरणा आणि मध्यम वैतरणा व इतर काही धरणांमध्ये पाऊस मागील वर्षापेक्षा चांगला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणांमधील पाण्याची पातळीही जास्त आहे. त्यामुळे आतापर्यंत पाण्याच्या उपलब्धतेविषयी चिंता करण्याची काहीच गरज नाही. पाणी कपातीबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही आणि अशी वेळ येण्याची शक्यता सुद्धा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरणात आता केवळ 10.68% म्हणजेच 1.54 लाख लिटर इतका पाणीसाठा आहे, या तलावाची एकूण साठवण क्षमता 14.47 लाख लिटर आहे. हे तलाव ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत तर त्यांचे पाटबंधारे विभाग नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत.