चंद्रपूर (Chandrapur) मध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर उमेश अग्रवाल (Umesh Agrawal) यांचा मृतदेह त्यांच्या हॉस्पिटल मध्ये आढळला आहे. साई आय हॉस्पिटलमध्ये (Sai Eye Hospital) त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. डॉक्टर उमेश यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्यांनी आत्महत्या केली याची उकल अद्याप होऊ शकलेली नाही. शवविच्छेदन अहवलामध्ये त्याचा खुलासा होईल.
डॉक्टर उमेश अग्रवाल मंगळवार, 11 जुलै दिवशी संध्याकाळी 5.30 पर्यंत काम करत होते. थकवा आल्याने झोपतो, उठवू नका असं त्यांनी हॉस्पिटल स्टाफला सांगितलं. त्यानंतर तासाभराने एका रूग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज होती म्हणून त्यांच्या खोलीत कर्मचारी आला पण डॉक्टरांची कुठलीच हालचाल झाली नाही. कर्मचार्यांनी डॉक्टरांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतू ते प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टर अग्रवाल त्यांना केबिनमध्येच मृतावस्थेत आढळले. मागील काही महिन्यांपासून ते नैराश्यात होते अशी चर्चा आहे. पण त्यांच्या मृत्यूच्या कारणावर अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान डॉ. अग्रवाल यांच्या बेड शेजारी इंजेक्शन पडलेले होते. त्यांनी स्वतःच इंजेक्शन टोचून घेत जीवन संपवलं असावा असा अंदाज आहे. डॉ. अग्रवाल यांची हालचाल होत नसल्याने आजूबाजूच्या काही स्पेशलिस्ट डॉक्टरांना बोलावण्यात आले पण तो पर्यंत डॉ. उमेश यांची प्राणज्योत मालवली होती.
डॉकटर अग्रवाल यांची पत्नी देखील प्रसिद्ध डेंटिस्ट आहे. तर मुलगा देखील मेडिसीन शिकत आहे. तो अंतिम वर्षाला आहे. डॉ. उमेश अग्रवाल यांच्या निधनाच्या वेळेस दोघेही नागपूरातच होते.