BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) या महिन्यात त्यांची 'प्रिमियम' ई-बस सेवा आणि जानेवारी 2023 मध्ये डबल-डेकर ई-बस (Double-Decker Electric Bus) सुरू करणार आहे. डबलडेकर ई-बसची मंजुरी अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यांतर्गत, 14 जानेवारी 2023 रोजी किमान 10 डबल-डेकर ई-बस सुरू केल्या जातील आणि त्यांची संख्या हळूहळू 50 पर्यंत वाढवली जाईल.

अधिकाऱ्याने सांगितले की, बेस्टने या महिन्याच्या अखेरीस आपली 'प्रिमियम सिंगल-डेकर' ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये प्रवासी अॅपद्वारे त्यांची जागा आरक्षित करू शकतील. पुढील वर्षी जूनपासून टॅक्सी सेवा सुरू करण्याचाही परिवहन प्राधिकरणाचा विचार असून, त्यासाठी 500 इलेक्ट्रिक वाहने घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत यापूर्वीच निविदा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की लोक ई-बस किंवा डबल-डेकर बसची तिकिटे 'चलो अॅप'द्वारे बुक करू शकतात. या अॅपचा वापर सध्या तिकीट आणि बसच्या 'लाइव्ह ट्रॅकिंग'साठी केला जात आहे. दरम्यान, बेस्ट मुंबई आणि आसपास बस सेवा पुरवते आणि त्यांच्याजवळ जवळपास 3,500 बसेसचा ताफा आहे, ज्यामध्ये 400 हून अधिक ई-बस आहेत. (हेही वाचा: एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात; 4 ठार, 13 गंभीर जखमी; यवतमाळ जिल्ह्यातील घटना)

परिवहन प्राधिकरणाच्या ताफ्यात 45 नॉन-एसी डबल-डेकर डिझेल बस आहेत, परंतु त्या 2023-24 मध्ये टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. दरम्यान, बेस्टने लोकांसाठी शहरात 330 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. दक्षिण मुंबई तसेच उपनगरी भागासह शहरात 55 ठिकाणी ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.