दिल्लीतील निझामुद्दीन येथे जो प्रकार घडला, असे महाराष्ट्रात घडू देऊ नका; राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

देशात कोरोनाचे (Coronavirus) थैमान घातलेअसताना 18 मार्च रोजी दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. यातील काही लोक कोरोनाबाधीत असून त्यांच्यामुळे देशासमोर संकट उभे झाले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीतील निझामुद्दीन येथे जो प्रकार घडला, असे आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) घडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेकडे केले आहे. शरद पवार यांनी आज 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. परंतु, त्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहेत, असेही पवार म्हणाले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात मोठ्या संख्येत लोक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घरी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्याने त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात सामील झालेल्या काही जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी CM Relief Fund साठी योगदान

व्हिडिओ-

शरद पवार काय म्हणाले?

दिल्लीत मर्कजच्या आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचे नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता,” असे शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असे ते म्हणाले. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी होणारा कार्यक्रमही पुढे ढकलावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.