Coronavirus: मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी CM Relief Fund साठी योगदान
Mumbai Police Head Constable with Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक असून नागरिकांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. कारण देशभरातील सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. तसेच राज्य सरकारकडून सुद्धा कोरोनाशी सामना करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पण दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी बड्या उद्योगपती ते सामान्य व्यक्ती आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबईचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी 10 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री रिलिफ फंडसाठी केली आहे.

मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू साहेब डांगरे यांनी 10 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. तसेच बापू डांगरे यांनी या रक्कमेचा चेक महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. त्याचसोबत शिर्डी संस्थानने 51 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी 11 कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने एक कोटी रुपये दिले आहेत.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या 3 दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 93 कोटी जमा)

तर महाराष्ट्रात 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 47 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत.