महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. मात्र, दोन्ही पक्ष परस्पर विरोधी विचारधारेचे असल्याचे समजत आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची भारत बचाव रॅली पार पडली. यात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नाव घेऊन वादग्रस्त वक्तव्य केले. यावर शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. वीर सावरकर केवळ महाराष्ट्राचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यांचा सर्वांनीच सन्मान केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर राहुल गांधी यांचीझारखंड येथे सभा पार पडली होती. त्यावेळी त्यांनी मेक ईन इंडियाच्या जागी रेप ईन इंडिया असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी शुक्रवारी केली होती. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे अयोजन केले होते. दरम्यान, मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. "वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत. जय हिंद" असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेसोबत तडजोड करण्यास तयार-आशिष शेलार
संजय राऊत यांचे ट्वीट-
विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत.
जय हिंद
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी शाब्दिक हल्ला चढवल्यानंतर दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे दिसते आहे.