Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात लॉकडाऊन जरी घोषित केला नसला तरी आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष नियमावली तयार केली असून 'ब्रेक द चेन' ही मोहिम सुरु केली आहे. राज्यात संचारबंदी लागू झाली असून नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले आहे. संजय पांडे (Sanjay Pande) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. दरम्यान आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणू नका असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.

राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 9,925 रुग्णांची नोंद व 9,273 रुग्ण झाले बरे

"जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका. अति उत्साहीपणा दाखवू नका. आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असं काही चित्रं दिसलं नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल,"असा इशाराही त्यांनी दिला. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा पडू नका, असंही ते म्हणाले.

पोलिसांकडे पॉवर आहेत, अॅक्ट आहेत, आम्ही त्याचा कमीत कमी त्याचा वापर करू. मात्र लोकांनी सहकार्य केलं नाही तर कारवाई निश्चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाहीय. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

अत्यावश्यक काम असेल तर पासशिवाय तुम्ही बाहेर पडू शकता. पण कारण नसताना बाहेर पडल्यास कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.