कोरोना व्हायरस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोरोनाचे (Coronavirus) संकट रोखण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार विविध उपाय योजना करत आहेत. वैद्यकीय दलातील कर्मचारी अहोरात्र झटून रुग्णांची देखभाल करत आहेत, मात्र तरीही रुग्णांच्या वतीने काहीसे विचित्र आणि अनपेक्षित वागणूक दिसून येत आहे. डोंबिवली (Dombivli) मध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाइन (Qurantine) करून ठेवण्यात आलेला एक रुग्ण शनिवारी रात्री पळून गेल्याचे समजत आहे. डोंबिवली आणि ठाणे परिसरात यामुळे खळबळ माजली आहे. हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झालेले नाही, तसा संशय आहे, मात्र जर का व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असेल आणि हा व्यक्ती इतरांच्या संपर्कात आला तर ही लागण आणखीन पसरण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री पळुन गेलेला हा व्यक्ती कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या पळून गेलेल्या व्यक्तीचा तपास सुरु केला आहे. दुसरीकडे, रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने हा रुग्ण पळून गेल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगत आहे.  Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या लग्नात कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांची उपस्थिती, विलिगिकरणात राहण्याची सूचना

दरम्यान, कल्‍याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील महापालिकेचे शास्‍त्रीनगर सामान्‍य रुग्‍णालय हे अलगीकरण रुग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणीही काही संशयितांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका विभागातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या घडीला 24 जणांवर उपचार सुरु होते त्यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर अजूनही 19 जणांवर उपचार सुरु आहेत.