fraud | (File image)

डोंबिवलीच्या रामनगर पोलीस परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल 150 पेक्षा अधिक लोकांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या आरोपील पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आरोपी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दहा टक्के फायदा देण्याचे प्रलोभन द्यायचा. फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दीडशेहून अधिक लोकांना चार कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावला. याबाबत डोंबिवली रामनगर पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. विनय वरटी या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले.  (हेही वाचा - Fraud case against Maruti Navale: सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांच्या विरोधात फसवणूकीचे आरोप; PF ची रक्कम लाटल्याचे आरोप)

विनय वरटी याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंगचे कार्यालय सुरू केले होते. सुरुवातीला नागरिकाना त्याने शेअर मार्केटवरील गुंतवणूकीवर 10 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या.गुन्हा दाखल झाल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोपी विनय डोंबिवलीमधून फरार झाला. मात्र पुण्यात लपून बसल्याचे माहिती डोंबिवलीतील रामनगर पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी पुण्यातील विद्यापीठ परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपी विनयला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये त्याच्यासह अजून पाच जणांचा समावेश असून यापैकी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे.