Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडीमध्ये (Bhiwandi) एका डॉक्टराने तरुणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. डॉ. रामकुवर यादव, असं या नराधमाचे नाव आहे. रामकुवर याच्यावर भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताचं रामकुवर फरार झाला आहे. सध्या भिवंडी पोलिस त्याचा तपास घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला आई-वडिल नसल्याने ती लहानपणापासून आपल्या मावशीकडे राहत होती. तिने आपल्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवले होते. पीडित तरुणीच्या मावशीने तिला बांधकाम व्यवसायिक असलेल्या डॉ. रामकुवर याची माहिती दिली होती. तसेच एक दिवस तिला रामकुवर याच्या कल्याण पूर्वेतील कार्यलयातही घेऊन गेली होती. त्यावेळी मावशीने रामकुवर याला तरुणीला आई-वडील नसल्याचे सांगत तिला घर घ्यायचं आहे, असं सांगितलं. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला घर शोधून देतो, असं सांगितलं.  (हेही वाचा - नवी मुंबई: लोकल पकडताना नवऱ्यासोबत ताटातुट झालेल्या महिलेवर 2 तासांमध्ये 3 जणांकडून बलात्कार)

दरम्यान, आरोपीने पीडित तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर रूम दाखविण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी तिला त्याच्या कारमध्ये घेऊन गेला. भिवंडी तालुक्याच्या हद्दीत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगत पीडित तरुणीला मुंबई-नाशिक मार्गावर घेऊन आला. तसेच दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याचे सांगत एका ढाब्यावर थांबला. त्यानंतर आरोपी डॉ. रामकुवर आणि त्याचा एक साथीदार व पीडित तरुणीने त्या ढाब्यावर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आरोपीने रबडीची ऑर्डर दिली. परंतु, आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याचं सांगत आरोपी आणि त्याच्या साथीदाराने रबडी खाल्ली नाही. मात्र, पीडित तरुणीने सर्व रबडी खाल्ली त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली.

पीडितेला चक्कर येत असल्याचे पाहून आरोपीने ढाब्याजवळील लॉजमध्ये भाड्याने रुम घेतली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीवर बलात्कार केला. पीडिता शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची कल्पना आली. तिने आरोपीला यासंदर्भात जाब विचारला. मात्र, आरोपीने या प्रकारासंदर्भात वाचता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित तरुणीने घरी गेल्यावर मावशीला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर मावशीने आणि तरुणीने जवळचे पोलिस ठाणे गाठून आरोपी डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा अधिक तपास भिवंडी पोलिस करत आहेत.