दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या काळात मुंबई-पुणे तसेच इतर शहरांतील अनेक चाकरमानी, विद्यार्थी दिवाळीसाठी आपापल्या गावी जातात. त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळ दररोज 359 जादा बस सोडणार आहेत. 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. यासोबत प्रवाशांसाठी अजून एक दिलासादायक गोष्ट म्हणजे दिवाळीनिमित्त महामंडळाने कोणतीही दरवाढ केली नाही.
दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाने 'प्रवासी मित्र' नावाची एक संकल्पना सुरु केली आहे. प्रत्येक आगारात, बस स्थानकात प्रवाशांच्या मदतीसाठी हे प्रवासी मित्र उपलब्ध असणार आहेत. एसटी संदर्भात कोणत्याही शंकेचे निरसन ते करतील.
विभागवार सोडण्यात येणाऱ्या जादा बस –
मुंबई-12, ठाणे- 19, पालघर- 22, रत्नागिरी- 14, सिंधुदुर्ग- 8, पुणे- 64, कोल्हापूर- 7, सातारा- 3, सांगली- 4, अमरावती- 2, यवतमाळ- 5, नाशिक- 23, जळगाव- 8, धुळे- 35, अहमदनगर- 9, औरंगाबाद- 14, बीड- 9, जालना- 5, लातूर- 10, नांदेड- 13, उस्मानाबाद- 11, परभणी- 23
(हेही वाचा: एसटी बंद पडल्यास अरीरिक्त शुल्क न भरता इतर कोणत्याही बस मधून करा प्रवास; दिवाकर रावते यांची घोषणा)
या विशेष बसच्या आरक्षणाची सुविधा प्रत्येक स्थानकात आणि आगारात उपलब्ध असणार आहे. दिवाळीचा हंगाम संपूपर्यंत प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्येही कपात करण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात मिळणारा सानुग्रह अनुदान अजून न मिळाल्याने एसटी कर्मचारी 25 ऑक्टोबर रोजी संपावर जाण्याची शक्यता आहे.