New Home Minister Dilip Walse Patil: हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार- दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. महाविकासआघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) तसा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil, New Home Minister of Maharashtra) यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. परमबीर सिंह यांनी प्रतिमहिना 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. त्यानंतर अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर गृहमंत्री पदाची जाबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नाही'

गृहमंत्री म्हणून काम करत असताना पोलिसांच्या कामात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी ग्वाहीच दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय कोरोना काळात पोलिसांवरील ताण वाढला आहे. अशा वेळी पोलिसांचे मनौधैर्य वाढविण्यावर भर दिला जाईल. याशिवा पोलिसांच्या बदल्या, दैनंदिन कारवाई, कामकाज यांमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. पोलिसांना अधिक सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले जाईल. या शिवाय सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू माणून काम केले जाईल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra New Home Minster: शरद पवार यांनी गृहमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का केली? जाणून घ्या कारण)

'आजी-माजी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार'

'पोलीस दलात विविध प्रकारचे गट-तट असल्याची चर्चा आहे' याबाबत विचारले असता दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्याचे गृहमंत्री म्हणून मी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे मी याबाबत इतक्यात प्रतिक्रिया देणार नाही. लवकरच मी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतरच याबाबत बोलू शकेन असे वळसे पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करण्यास संधी दिल्याबद्दल वळसे पाटील यांनी शरद पवार आणि पक्षातील सहकाऱ्यांचे आभारही मानले.

दरम्यान, अनिल देशमुख हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेच प्रमुख नेते दिल्लीमध्ये नाहीत. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्लीबाहेर आहेत. त्यामुळे अनिल देशमुख हे कोणत्याही राजकीय गाठीभेटी घेत नाहीत. परंतू, अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ कायदेपंडीतांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अनिल देशमुख आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कायदेतज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख आणि सिंघवी यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचे समजते.