Dhule Zilla Parishad Election Results 2020: धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी; महाविकाआघाडी पॅटर्न अयशस्वी
BJP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Dhule Zilla Parishad Election Results 2020: धुळे जिल्हा परिषद (Dhule Zilla Parishad) निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि काँग्रेसने (Congress) धुळे जिल्ह्यातही महाविकाआघाडी (Maha Vikas Aghadi ) पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, इथे हा पॅटर्न यशस्वी होऊ शकला नाही. धुळे जिल्हा परिषदेत एकूण 56 जागांपैकी 31 जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे किमान धुळे जिल्हा परिषदेत तरी महाविकासआघाडीला जनतेने सत्तेची चावी हाती दिली नसल्याचे पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्ह्यात एकूण 56 जागांसाठी निवडणूक होणे अपेक्षीत होते. मात्र, त्यापैकी 5 जागांवर बिनविरोध निवड झाल्याने केवळ 51 जागांसाठीच इथे निवडणूक पार पडली. त्या 51 जागांपैकी 43 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजप 31, शिवसेना 3, राष्ट्रीय काँग्रेस 5, रष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि इतर उमेदवार 2 जागांवर विजयी झाले आहेत. दरम्यान, उर्वरीत जागांचे निकाल अद्याप हाती यायचे आहेत.

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या होत्या. यात भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर केलेला आरोप खळबळजनक होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने महाराष्ट्र ओरबडून खाल्ला असा सणसणीत आरोप करुन गोटे यांनी खळबळ उडवून दिली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी तर महाविकासआघाडीसाठी बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अमित देशमुख, दादा भुसे या मंत्र्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासांठी दिग्गजांनी प्रचारसभा घेतल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020 Live Updates: आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना धक्का; पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ मधून पराभव)

दरम्यान, धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सुभाष भामरे म्हणाले की, भाजपचा हा केवळ कोणा एका व्यक्तीचा विजय नाही. हा पक्ष संघटनेचा विजय आहे. अनिल गोटे यांच्याकडे आणि त्यांच्या आरोपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अनिल गोये यांच्या आरोपांना त्यांचे निकटवर्तीयही गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही भामरे यांनी गोटे यांना लगावला.