लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणूक तोंडावर आली असून निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करु शकतो अशी स्थिती आहे. महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यातील घटक पक्षांचे जागावटाप (Mahayuti Seat Sharing) अद्यापही जाहीर झाले नाही. दरम्यान, आघाडी आणि युतीतील बेबनाव बाहेर येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असले तरी काही नेत्यांमुळे तो स्पष्ट दिसू लागला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मराव अत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी एका भाषणादरम्यान दिलेला इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
धर्मरावबाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी म्हटले आहे की, गडचिरोली लोकसभा मतदारसंघ (Gadchiroli Chimur Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. या ठिकाणाहून आपण निवडणूक लढवणार असून त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अब की बार 400 पारचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली नाही तर ते योग्य होणार नाही. मी कमळाच्या चिन्हावर लढल्याचे अजित पवार यांनाही आवडणार नाही. त्यामुळे या जागेहून मला लढायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवार यांचा एकही उमदेवार पडला तर अब की बार 400 पारचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे आत्राम यांनी म्हटले आहे.
गडचिरोली येथून महायुतीचाच उमेदवार निवडूण आणायचा आहे. त्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. मला विश्वास आहे की, उमेदवारी मलाच मिळेल. ही जागा जर निवडूण आली नाही तर महायुतीने ठेवलेले स्वप्न पूर्ण होणार नाही. दरम्यान, तरुणांना संधी मिळायला हवी. त्यामुळे पुढच्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी आपली मंत्रिपद सोडण्याची तयारी आहे. त्यामुळे आपण मंत्रिपद सोडून लोकसभा लढवणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी मला माझ्या मुलीला निवडूण आणायचे आहे. या ठिकाणीही बारामतीप्रमाणेच लढत होणार आहे. इथे माझ्या भावाचा मुलगा अंबरीश आत्राम आणि माझी मुलगी अशी बहिण भावात लढाई होणार असल्याचे आत्राम म्हणाले.
दरम्यान, निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आत्राम म्हणाले, एक लंके गेले तर त्यांच्याकडील पाच जण आपल्यात येतील. ते आपल्यातच आहेत. पाच सहा महिन कामे करुन घेतली आणि आता जात असतील तर त्याने फरक पडणार नसल्याचेही आत्राम या वेळी म्हणाले.