ACP Ramesh Nangare | (File Photo)

सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे (Ramesh Nangare) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन ( ACP Ramesh Nangare Passes Away) झाले आहे. सध्या त्यांची नेमणूक साकिनाका येथे होती. या आधी ते धारावी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. कोरोना व्हायरस संसर्गाचे अत्युच्च टोक महाराष्ट्रात असताना मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असणाऱ्या धारावी झोपडपट्टी परीसारत कोरोना नियंत्रणात ठेवण्यात रमेश नांगरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. अल्पावधीतच धारावी पॅटर्न ( Dharavi Pattern) जगभरात चर्चीला गेला. जगभरातील अनेक देशांनी मुंबई महापालिकेकडे धारावी पॅटर्नबाबत माहिती घेतली होती.

पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोना लस घेतली होती. या लसीकरणामुळे त्यांच्यातील कोरोना योद्धा अधिक सक्षमपणे कार्यरत होईल अशी भावना होती मात्र नियतीला ते मान्य नसावे. नांगरे यांच्या निधनामुळे पोलीस दलातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.

एक कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी अशी रमेश नांगरे यांची ओळख होती. जगभरातील अनुभव पाहता आणि कोरोना संक्रमणाचे कारण पाहता धारावी परिसरात कोरोना रोखणे हे एक मोठे आव्हान होते. राज्यासह देशाचे लक्ष धारावीकडे लागले होते. इतक्या दाटीवाटीच्या परीसरात कोरोना कसा रोखला जाणार? परंतू राज्य सरकार आणि पोलीस आणि आरोग्य प्रशासानाने महापालिकेच्या सहकार्याने हे करुन दाखवले.

धारावी परीसरात ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री राबविण्यात आली. अशावेळी नागरिकांचे सहकार्य मिळवणे आणि गर्दी रोखणे हे अत्यंत जबाबदारी आणि महत्त्वपूर्ण काम होते. यात पालिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार होती. धारावी पोलीस ठाण्यात तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर रमेश नांगरे हे कार्यरत होते. कोरोना संसर्गाचा धोका असतानाही कर्तव्यनिष्ठता या भावनेने रमेश नांगरे हे तेव्हा फिल्डवरती उतरेल आणि त्यांनी काम केले होते. त्या काळात धारावी पोलीस ठाण्यातील एकूण 33 पैकी 32 पोलिसांना करोना संक्रमण झाले होते.