Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी काल जगभरातील कोरोना परिस्थितीची माहिती देताना कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशस्वी ठरलेल्या काही जगातल्या देशांसोबतच धारावी (Dharavi) चा देखील उल्लेख केला. जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. अगदी दाटीवाटीने राहणार्‍या लाखोंच्या लोकवस्तीमध्ये 1 एप्रिलला पहिल्यांदा कोरोनाचा रूग्ण आढळला आणि बघता बघता रूग्ण संख्या वाढली. मात्र दाटीच्या वस्तीमध्येही कोरोनावर ज्याप्रकारे नियंत्रण मिळवलं जात आहे त्यावरून आता जागतिक स्तरावर 'धारावी मॉडेल'चं कौतुक होतं आहे. पण इतका कौतुकाचा वर्षाव होणारं हे धारावी मॉडेल नेमकं आहे काय? हे तुम्हांला ठाऊक आहे का? WHO ने घेतली धारावीत कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याची दखल; आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मानले धारावीकरांचे आभार

धारावीमध्ये कोरोना फैलावावर आता प्रशासनाने नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. मंगळवार 7 जुलै दिवशी धारावीत केवळ 1 कोरोनाबाधित रूग्ण आढळला आहे. तर एकूण बाधितांची संख्या 2359 वर पोहचली आहे. एकेकाळी 24 तासांत 100 च्या पार आढळणारे कोरोना बाधित ते आता अवघा 1 ही किमया धारावीत पहा नेमकी कशी साधली?

धारवीत कोरोना रोखला कसा?

2.5 स्केअर किमीच्या धारावीत अंदाजे लोकसंख्या घनता 2,27,136 प्रति चौरस किमी इतकी आहे. लेदर, टेक्सटाईल ते मांस व्यवसाय असे लहान सहान उद्योग धारावीत आहेत. सामान्यपणे $1 बिलियन इतका आंतरराष्ट्रीय व्यवहार धारावीत वर्षाला होत असतो. त्यामुळे या भागात 5000 GST-registered उपक्रम आहेत. त्यामुळे या व्यवसायांसमोर लॉकडाऊन दरम्यान मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. धारावीत दाटीवाटीची लोकसंख्या पाहता 'होम क्वरंटीन' हा पर्याय अशक्य होता. पण “chase the virus” म्हणजेच कोरोना व्हायरसला हुडकून काढण्यासाठी Public Private Partnership मधून काही योजना राबवण्यात आल्या.

धारावीमध्ये हाय रिस्क झोन मध्ये तातडीने स्क्रिनिंग सुरू करण्यात आलं. फिव्हर कॅम्पच्या मदतीने संशयित रूग्ण शोधायला मदत झाली. 'मिशन मोड' मधून याभागातील अनेक खाजगी डॉक्टर पुढे आले. त्यांना मुंबई महानगर पालिकेकडून पीपीई किट्स, थर्मल स्कॅनर्स, पल्स ऑक्सिमीटर्स, मास्क, ग्लोव्ह्ज देण्यात आले. त्यांनी दारोदारी जाऊन हाय रिस्क झोनमध्ये जाऊन रूग्णांना शोधून काढलं.

खाजगी डॉक्टर्सना तातडीने त्यांचे क्लिनिक्स उघडण्याचे आदेश होते. त्यांचे क्लिनिक्स नियमित सॅनिटाईज करण्याची जबाबदारी पालिकेने उचलली. होम क्वारंटीन हा पर्याय धारावीमध्ये शक्य नसल्याने तेथे स्थानिक हॉल्स, शाळा, महाविद्यालयं ताब्यात घेऊन तेथे इन्स्टिट्युशनल क्वारंटीनची सोय करण्यात आली. सोबत कम्युनिटी किचन देखील सुरू झाली होती.

ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटींग मॉडेल

धारावीमध्ये झपाट्याने ट्रेसिंग आणि टेस्टिंग करण्यात आले. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना तात्काळ रूग्णालयामध्ये तर त्यांच्या घरातील व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटीन सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. अनेकांना जागच्या जागीच उपचार मिळाल्याने मृत्यूदर कमी ठेवण्यातही यश आले आहे.

धारावीवर सुरूवातीपासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक, राज्य सरकार, मुंबई महानगर पालिका लक्ष ठेवून होती. केंद्राच्या पथकानेही धारावीत जाऊन ग्राऊंड रिपोर्ट पाहिला होता. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः भेट देऊन जातीने या भागात लक्ष दिले होते. पालिका आयुक्त इक्बाल चहल सिंग यांचादेखील याभागात पूर्वी काम केल्याचा अनुभव कामी आल्याचंं म्हटलं जातं.

मुंबईमध्ये सुरूवातीला कोरोना हॉटस्पॉट असलेला धारावी हा भाग आता हळूहळू कोरोनामुक्त असा प्रवास करत आहे. या प्रवासादरम्यान पालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा यासोबतच धारावीमधील नागरिकांनी देखील दाखवलेल्या संयमाचं कौतुक होत आहे.