Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाला सुरुवात झाली. त्यानंतर फैलाव झपाट्याने वाढू लागला. कोरोना बाधितांच्या संख्येत मुंबई (Mumbai) अग्रस्थानी होती. त्यात मुंबईतील दाटीवाटीचा भाग विशेषत: धारावी (Dharavi) मध्ये संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक होते. दरम्यान, या परिसरातील कोविड-19 (Covid-19) चा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे आव्हानात्मक होते. मात्र ते आता शक्य झाल्याचे दिसून येत आहे. धारावी मध्ये आज (25 डिसेंबर, शुक्रवार) रोजी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. विशेष म्हणजे 1 एप्रिलपासून ही परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. आता सध्या धारावीत केवळ 12 सक्रीय रुग्ण (Active Cases) आहेत.

धारावी मध्ये 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मुंबई शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परंतु, राज्य सरकार, पालिका प्रशासन, स्वयंसेवी संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांनी या दाटीवाटीच्या परिसरातील कोरोना फैलावावर नियंत्रण मिळवण्यास यश आले. याला धारावीतील नागरिकांची देखील मोलाची साथ मिळाली. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटींग या मॉडेलच्या मदतीने धारावीतील कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यात येत होता.

ANI Tweet:

तब्बल 8 महिन्यांनंतर धारावीमध्ये कोरोनाच्या झिरो केसेसची नोंद झाली आहे. त्यामुळे अगदी जिद्दीने प्रशासन आणि नागरिकांनी ही लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.  दरम्यान, धारावीत राबवल्या गेलेल्या मॉडलचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom यांनी देखील कौतुक केले होते. (Dharavi Model: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom यांनी कौतुक केलेलं 'धारावी मॉडेल' नेमकं काय? आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी कशी मिळवतेय COVID 19 वर नियंत्रण)

कालच्या अपडेटनुसार, राज्यात एकूण  54,891 अॅक्टीव्ह रुग्ण असून 18,04,871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.5% इतका झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. तसंच ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पालिका हद्दीत नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे.