धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 'या' मानलेल्या बहिणीचा भाऊबीज निमित्त आशीर्वाद; पंकजा मुंडे यांच्यासोबतचा दुरावा अजूनही कायम?
Pankaja Munde And Dhananjay Munde (Photo Credits: Twitter/ Facebook)

भाऊ- बहिणीच्या नात्यासाठी महत्वाचा असा सण म्हणजेच भाऊबीज (Bhaubeej) आज देशभरात मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मात्र बीड (Beed) जिल्ह्यात मुंडे कुटुंबातील भावंडांमध्ये  गेली अनेक वर्ष दुरावा पाहायला मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra assembly Elections)हा दुरावा अधिक वाढताना पाहायला मिळाला. परळी (Parali) मतदारसंघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांच्यातील आमदारकीच्या शर्यतीत धनंजय यांनी मताधिक्याने विजय मिळवत पंकजा यांना धूळ चारली होती. हा सारा प्रकार केवळ मतांचा नसून अनेकदा यामध्ये वैयक्तिक हेवेदावे सुद्धा समोर आले होते पण आता निकाल जाहीर झाल्यावर तरी सणांच्या निमित्ताने ही मंडळी जवळ येतील अशी अपेक्षा असताना धनंजय मुंडे यांचे एक ट्विट खास चर्चेत आले आहे. आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर धनंजय यांनी समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या सोबत फोटो शेअर करून बहिणीचा आशीर्वाद घेत असल्याच्या आशयाचे ट्विट केले आहे. आश्चर्य म्हणजे धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही.

धनंजय मुंडे यांनी कालच ट्विट मधून सुप्रिया सुळे यांचा फोटो शेअर करताना, त्यांनी मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं,बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं! असे म्हंटले होते. तसेच सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देत भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं सुद्धा कठीण आहे. असेही धनंजय यांनी लिहिले आहे.

Pankaja Munde यांना पराभव होऊनही मिळणार मंत्रिपद? वाचा संपूर्ण बातमी

धनंजय मुंडे ट्विट

दरम्यान. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडें यांच्यावर टीका करणारी क्लिप व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ झाला होता. यावेळी धनंजय यांनी नंतर स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले होते तर दुसरीकडे पंकजा यांनी मतदानाच्या निकलानंतरही आपण त्या क्लिपच्या धक्क्यातून सावरू शकलो नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. या सर्व प्रकरणी निदान आज सणाच्या दिवशी काहीतरी समजूत निघेल का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.