
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी फेसबूक (Facebook) पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ज्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुला जर गायिका बनायचे असले तर, तर मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉंच करीन असे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या महिलेने म्हंटले आहे. तसेच पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केले आहे. हे देखील वाचा- Congress, BJP MLA meets Sharad Pawar: भाजप आमदार आशिष शेलार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून शरद पवार यांची भेट; दिल्ली निवास्थानी चर्चा
धनंजय मुंडे फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले?
कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत आहेत. तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत. संबंधित महिलेने समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. माझ्याकडे या महिलेच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करून कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएस रुपी पुरावे आहेत. याप्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, संबंधित महिलेने ट्विट करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. यामुळे या प्रकरणांवरून राज्याच्या राजकारण आणखी एक नवा मुद्दा उपस्थित होतो की काय? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. याआधी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.