महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन झाली नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजवट लागू झाल्याने राज्याची सर्व सुत्रे राज्यपालांकडे गेली आहेत. याच पार्श्वभुमीवर काही मंत्र्यांनी राहत असलेले बंगले सोडण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर्षा बंगल्यात (Varsha Bungalow) मुक्कामासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत देऊ करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यातच राहणार आहे.
राज्यात भापच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पक्षातील काही मंत्र्यांनी राहत्या घरातील सामानाची बांधणी सुरु केली. पण देवेंद्र फडणवीस हे अद्याप वर्षा बंगल्यातच राहत असून पुढील तीन महिने सुद्धा येथेच असणार आहेत. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार पुढील पाच वर्षासाठी होईल असा दावा शरद पवार यांनी केला. त्यानुसार सत्ता स्थापनेसाठी वेगाने हालचाली सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यात भाजपचे सरकार न येण्याचे चिन्ह दिसून येत असल्याने पुढील काही काळातच त्यांना वर्षा बंगल्यातून बाहेर पडावे लागणार आहे.(हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करुन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचे प्रतिउत्तर)
तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानुसार राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात येईल आणि पाच वर्षे कायम राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले परंतु, राज्यात सत्तास्थापनेची तिढा कायम आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील? की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला हात देऊन महाशिवआघाडी स्थापन करेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.