देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात  गुन्हे लपवल्याच्या आरोपावरून चालणार खटला
Devendra Fadnavis (Photo Credits: IANS)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील दोन गुन्हे लपवल्याच्या आरोपावरून आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून आज सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court)  फडणवीस यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशीही माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्यातर्फे फडणवीस यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली होती, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मानहानी व फसवणुकीच्या दोन प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती असा आरोप उके यांच्याकडून लागवण्यात आला होता.

मुंबई: NCP नेत्या विद्या चव्हाण आणि कुटुंबियांच्या विरोधात विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; सुनेचा छळ केल्याचा आरोप

अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध "देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी दिलेला अर्ज खोटा असून त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांची महिती हेतूपूर्वक लपवली आहे असा आरोप लगावला होता. नियमांचे उल्लंघन केल्याने फडणवीस यांची निवड रद्द करावी अशी याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आता नागपूरच्या सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 2009 व 2014 रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील दोन गुन्हे लपवले होते, असा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलायच्या नागपूर खंडपीठाला दिले होते.या प्रकरणात जामिनासाठी फडणवीस स्वतः नागपूर कोर्टात उपस्थित होते, त्यांतर त्यांनी याचिका करून पुढील सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी अशी विनंती केली होती ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.