राज ठाकरे बारामतीहून येणारी स्क्रिप्ट बोलतात - देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावरील टीकेला दिलं प्रत्युत्तर
Chief Minister Devendra Fadnavis | (Photo credits: file photo)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election)  तोंडावर देशभरात राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी पक्षाच्या वर्धापन सोहळ्यामध्ये भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे हे बारामतीचे पोपट आहेत. ते कलाकार असून त्यांची स्क्रिप्ट बारामतीहून येते. तेवढीच ते बोलतात असे वक्तव्य मुख्यमंत्र्यानी केले आहेत. निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल: राज ठाकरे

राज ठाकरेंच्या पक्षाला ना आमदार, खासदार, नगरसेवक निवडून आणता येतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. आज मुख्यमंत्री भाजपाच्या महिला मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज देखील उपस्थित होत्या.

भारत सुरक्षित हातामध्ये आहे. मागील 50 वर्षात जे शक्य नव्हतं ते पाच वर्षात घडलं. आगामी लोकसभेमध्ये महाराष्ट्रात 45 जागा शिवसेना - भाजपा युतीच्या असतील असा विश्वास दाखवताना पुन्हा जोमाने सज्ज व्हा असेही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आज निवडणूक अयोग लोकसभा 2019 च्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे.