![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Devendra-Fadnavis-2-1024x569-1-380x214.jpg)
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी सत्तास्थापन करेल असे चित्र दिसत होते, त्याचवेळी, भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडत सत्तास्थापनेचा दावा केला. इतकच नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाची शपतही घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर पहिली स्वाक्षरी केली. त्यानंतर आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक असा निर्णय घेण्यात आला. अवकाळी पाऊस बाधित शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र आकस्मिक निधीतून आणखी 5380 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस ट्वीट -
CM @Dev_Fadnavis sanctions another ₹5380 crore from Maharashtra Contingency Fund to give relief to unseasonal rain affected farmers. https://t.co/qLmtN2x2f1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 25, 2019
याआधी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किंचित दिलासा म्ह्णून, राज्यपाल कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. खरिपाची शेती (Kharif Crops) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति 2 हेक्टर मागे 8000 रुपये, तर बागायती (Horticulture) आणि बारमाही (Perennial) शेती करणाऱ्यांना प्रति 2 हेक्टर मागे 18000 रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली होते. इतकी तुटपुंजी मदत दिल्याने अनेकांनी राज्यपाल आणि सरकारवर टीका केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी 5380 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस पक्षांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी चालू असताना, अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता महाविकासआघाडीने पुन्हा जुळवाजुळव करून आपल्या 162 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्त केले आहे. अशाप्रकारे महाविकासआघाडीने 145 चा आकडा पार केला आहे. अशात हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. भाजपने तोडफोडीचे राजकारण केले असा आरोप पक्षावर ठेवण्यात आला आहे.