सरकार कुणाची? शिवसेनेची! बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर आले असताना शिवसैनिकांची घोषणाबाजी (Watch Video)
Devendra Fadnavis, Pankaja Munde And Vinod Tawade At Shivteerth (Photo Credits: ANI)

Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 7 व्या स्मृतिदिन प्रित्यर्थ आज सकाळपासूनच शिवाजी पार्क (Shivaji Park)  येथील शिवतीर्थवर दिग्गज नेतेमंडळींची गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच भाजपाकडून (BJP) कोणत्याही नेत्याची उपस्थिती नसणे हा चर्चेचा विषय ठरत होता, मात्र काही वेळेपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी शिवतीर्थवर भेट देऊन या चर्चांना विराम दिला. यावेळेस देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर  बाळासाहेबांना आदरांजली वाहून बाहेर निघत असताना  सरकार कुणाची? शिवसेनेची असे म्हणत शिवसैनिकांनी  घोषणा देण्यास सुरुवात केली.  मात्र यावेळी महायुती, वाद अशा कोणत्याही विषयावर चर्चा न करता फडणवीस, मुंडे आणि तावडे यांनी  थेट बाहेरचा मार्ग स्वीकारला.

ANI ट्विट 

हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करुन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचे प्रतिउत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस माध्यमांशी संवाद साधने टाळले असले तरीही पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देत बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. "शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भाजप-शिवसेना युतीचे श्रद्धास्थान आहेत, आज जरी त्यांच्या मार्गदर्शनाची कमतरता जाणवत आहे तरी अजूनही त्यांच्या विचारांवर आम्ही चालत असून पुढेही चालत राहू",असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला.

तर, दुसरीकडे विनोद तावडे यांनी, बाळासाहेब हे भाजप- शिवसेना कुटुंबाचे मुख्य होते. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे, असे म्हणत शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहिली. (देवेंद्र फडणवीस यांना 'वर्षा' बंगल्यावर मुक्कामासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत)

दरम्यान, सकाळपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत तसेच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ या नेत्यांनी शिवतीर्थवर हजेरी लावली होती,  महायुती, वाद अशा कोणत्याही विषयावर चर्चा न करता थेट बाहेरचा मार्ग स्वीकारला.