Devendra Fadnavis | (File Photo)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये 2 दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) देखील मोठा फटका बसला. राज्याच्या किनारपट्टी जवळून हे वादळ जात असताना ताशी 114 इतक्या रेकॉर्डब्रेक वेगाचे वारे वाहत असल्याने अनेक झाडांचे , घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याच नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज (19 मे) विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचा आज रायगड दौरा आहे. देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या कोकण दौर्‍यावर आ हेत. ते कोकणात विविध भागा मध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान आज अलिबाग मध्ये रोह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक देखील करणार आहेत. आज रायगड आणि दुसर्‍या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत. मागील वर्षी 'निसर्ग' चक्रीवादळ आणि त्यापाठोपाठ यंदा त्याहून शक्तिशाली 'तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये झालेल्या नुकसानीचा पुन्हा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. (नक्की वाचा: Tree Uprooted in Mumbai Viral Video: तौक्ते चक्रीवादळात उन्मळून पडणार्‍या झाडाखाली अवघ्या काही सेकंदासाठी बचावली महिला; पहा अंगावर शहारा आणणारा हा क्षण!).

कोकणात चक्रीवादळानंतर अनेक गावामध्ये बत्ती गूल होती. तर वीजेचे खांब, झाडं कोलमडून पडल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मीडीयाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1,059 शेतकऱ्यांच्या 3,375 हेक्टर क्षेत्रावरच्या बागेचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं अशी माहिती कृषी अधिक्षकांनी दिली आहे.