Devendra Fadnavis | (Photo credit: archived, edited, symbolic images)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा मध्य प्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara) येथील पुतळा बुलडोझरचा वापर करुन हटवल्यानंतर देशभरातील शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन मध्य प्रदेश सरकारने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सन्मानाने बसविण्याचेही अश्वासन दिले आहे. दरम्यान, भाजपनेही पुतळा हटवल्याचा निषेध केला आहे. तसेच हा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सन्मानाने बसविण्यात यावा अशी मागणी केली आहे. विधानससभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत आज ही मागणी केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे. ही टीका करताना शिवसेना (Shiv Sena) सत्तेसाठी आणखी किती लाचार होणार? असा खोचक सवालही पडणवीस यांनी विचारला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, देशातील महापुरुषांचा अपमान काँग्रेस नेहमीच करत आली आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेली शिवसेनाही या अपमानाबद्दल काही बोलत नाही. काँग्रेसने पक्षाच्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत लिखाण केले आहे. तसेच, कोणताही अभ्यास न करता शिवसेना सावरकर यांचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. यावरुन शिवसेनेवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना याबाबत काही बोलणार आहे का? शिवसेना सत्तेसाठी किती काळ लाचारी करणार असा खोचक सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. काँग्रेसने पक्षाच्या 'शिदोरी' या मासिकात लिखाण केल्याचा दाखला या वेळी फडणवीस यांनी दिला.

मध्यप्रदेश राज्यात असलेल्या छिंदवाडा येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा बुलडोझरचा वापर करत हटवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी सन्मानाने उभारावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर यांच्यासारख्या महापुरुषांची बदनामी भाजप कधीही सहन करणार नाही. सरकारने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागावी तसेच, हा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी सन्मानाने उभारावा अन्यथा भाजप तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेन, असेही फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, शिवाजी महाराजांचा पुतळा छिंदवाडा येथे पुन्हा सन्मानाने बसवणार; मध्य प्रदेश सरकारने प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले)

दरम्यान, छिंदवाडा येथील घडलेल्या प्रकराची चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेश सरकारने या आधीच दिले आहेत. तसेच, ज्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यात आला त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा पन्हा उभारण्यात येईल, असेही मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे. दरम्यान, सरकारने पुतळा उभारण्याचे अश्वासन दिले असूनही भाजपने पुन्हा या ठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.