Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात  पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची तक्रार;  सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बदनामी केल्याचा आरोप
DCP Abhishek Trimukhe, Arnab Goswami | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत ( Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी केलेल्या वार्तांकन प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे ( Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. मुबई पोलीस दलात कार्यरत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे (Mumbai DCP Abhishek Trimukhe) यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आपली आणि मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी केली, असा आरोप केला आहे. त्रिमुखे ( Abhishek Trimukhe) यांनी गोस्वामी यांच्या विरोधात सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. मुंबई येथील वांद्रे परिसरात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. सुशांतची हत्या की आत्महत्या याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरु होता. दरम्यान, या प्रकरणाच्या सुरुवातीपासून अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक वाहिनी वृत्त प्रसारीत करीत होती. यावरुनच अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा, TRP Scam: अर्णब गोस्वामी यांनी मला 40 लाख रुपये आणि 12,000 अमेरिकी डॉलर्स दिले, पार्थो दासगुप्ता यांचा दावा- मीडिया रिपोर्ट)

अभिषेक त्रिमुखे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वार्तांकन करताना मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या मारेकऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अभिषेक त्रिमुखे हे एक महिन्यांपासूनच एकमेकांच्या संपर्कात होते, असे वृत्त रिपब्लिकन वहिनीवरुन सातत्याने प्रसिद्ध करण्यात आले. केवळ दृष्ट आणि बदनामी करण्याच्या हेतूनेच हे वृत्त प्रसारित करण्यात आले, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, रिपब्लिक वाहिनीने अशा प्रकारचे वृत्त दाखवून आपल्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचवली आहे. ही हानी भरुन येण्यास प्रदीर्घ काळ लागणार आहे. त्यामुळे ही हानी भरुन यावी यासाठी नुकसानभरपाई देण्यात यावेत अशी मागणी त्रमुखेय यांनी आपल्या तक्रारीत केले आहेत.