राज्य सरकार हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या विचाराचे आहे. विषय न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहायला हवी. मराठा समाजाच्या तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षण, वीजबिल माफी ( Electricity Bill Waiver), एमपीएसीने (MPSC ) दाखल केलेली याचिका अशा विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
मराठा समाजाच्या तरुणांनी संयम बाळगावा
राज्य सरकार हे मराठा समाजास आरक्षण मिळावे याच विचारांचे आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. न्यायालयातही आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मराठा समाजातील तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्याची आर्थिक स्थिती बेताची
वीजबिल माफीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती सध्या बेताची आहे. निर्णय घेताना सर्व गोष्टींचा प्रामुख्याने कोरोनाचा विचार करुन घ्यावे लागत आहेत. तसेच, हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. असे विषय केवळ त्या खात्याचे मंत्रीच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळ मिळून घेत असते असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा केला प्रयत्न)
'एमपीएससी'ने कोर्टात जायला नको होतं
राज्य सरकारला अंधारात ठेऊन 'एमपीएससी'ने कोर्टात याचिका दाखल केली आहे. 'एमपीएससी'च्या या उठाठेवीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तेसच, राज्याच्या मुख्य सचिवांकडून याबाबत अधिक माहिती मागवली आहे. ही माहिती आल्यानंतर पुढील कारवाईबाबत विचार केला जाईल, असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले.
कोणाचीही सुरक्षा काढणे, पुरवणे याबाबत समिती निर्णय घेते
कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा पुरविण्याबाबत, काढून घेण्याबाबत एक समिती असते. या समितीत पोलीस अधिकारी, आयपीएस अधिकारी असतात. या अधिकाऱ्यांची समिती याबाबत निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकार त्यात फार हस्तक्षेप करत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुणे येथील काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत असे वृत्त होते. याबाबत विचारले असता आजच मला याबाबत प्रसारमाध्यमांतून कळले. मला अद्याप याबाबत माहिती नाही. मी उद्या पणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात काही बैठका आहेत. या वेळी मला हा विषय अधिक तपशीलाने कळू शकेल असे अजित पवार म्हणाले.