![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/01/CM-Uddhav-Thackeray-Aditya-Thackeray-380x214.jpg)
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला राजकीय वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आधीच संकटात सापडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याविरोधात या तिघांना आणखी कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्याची विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली असून त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्यात आले आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. यामुळेच महाराष्ट्रात दंगली आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे म्हटले आहे. (हेही वाचा: संजय राऊत यांना ED कडून नवं समन्स; 1 जुलैला हजर राहण्याचे आदेश)
नुकतेच संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, गुवाहाटीतील 40 आमदार मृतदेह आहेत, त्यांचे आत्मा मेले आहेत. परत आल्यावर त्यांचे मृतदेह थेट विधानसभेत शवविच्छेदनासाठी पाठवले जातील. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना धमकी देत गुवाहाटीमध्ये किती दिवस लपून बसणार, तुम्हाला कधीतरी मुंबईत यावे लागेल, असे म्हटले होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही परत या, माझ्यासोबत बसा आणि शिवसैनिक आणि जनता यांच्यात निर्माण झालेला संभ्रम दूर करा. तुम्ही लोक परत आलात तर तोडगा निघू शकेल. पक्षाध्यक्ष आणि कुटुंबप्रमुख या नात्याने मला अजूनही तुमची काळजी आहे.’