Rajesh Tope on Maharashtra School: येत्या 10 ते 15 दिवसांनी महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर विचार केला जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रविवारी सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की, मुलांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे आणि शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही राजेश टोपे म्हणाले. राज्यभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं की, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी काही लोकांकडून होत आहे.
यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं की, मुलांमध्ये कोरोना संसर्ग कमी असल्याने आम्ही 10-15 दिवसांनी यावर विचार करू. मुख्यमंत्री या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करताना टोपे म्हणाले की, लोकांना कोरोनाची भीती वाटत नाही. कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सामान्य लोकांनी तसेच राजकारण्यांनी गर्दी टाळली पाहिजे, असं आवाहनदेखील राजेश टोपे यांनी यावेळी केलं. (वाचा - Omicron in Maharashtra Update: महाराष्ट्रात 'ओमायक्रोन नकोच पण डेल्टाही आवरा' म्हणायची वेळ; व्हेरियंटने वाढवली धास्ती)
दरम्यान, साथीच्या आजाराच्या सद्य परिस्थितीवर बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी आहे. कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील 10-15 टक्के पात्र लोकांना अद्याप लसीकरण करणे बाकी आहे. कारण लसीकरण करणे हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून असते. 100% लसीकरण सुनिश्चित करणे हे आरोग्य विभागासाठी आव्हान आहे आणि आम्ही ते शक्य करू, असा विश्वासही यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले होते की, महाराष्ट्रात शनिवारी 42,462 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली आहे. जी शुक्रवारच्या तुलनेत 749 कमी आहे.