Omicron | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या सगळ्यात ओमायक्रोन (Omicron) हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट (New Variant) नवे आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात मात्र काहीशी वेगळीच स्थिती पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राला ओमायक्रोन संसर्ग वाढायला नकोच आहे. मात्र, त्यासोबत डेल्टा व्हेरीएंटही नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमायक्रन संसर्गापेक्षा डेल्टा व्हेरीएंट (Delta Variant) अधिक प्रभावशाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात 'ओमायक्रोन नकोच पण डेल्टाही आवरा' असे म्हणायची वेळ आली आहे. प्रामुख्याने मुंबई (Mumbai) शहरासह महाराष्ट्रात इतर ठिकाणीही कोरोना विषाणून मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला देत दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यांनी म्हटले आहे की, राज्यात आतापर्यंत 4200 पेक्षा अधिक नमुन्यांमध्ये 68% पेक्षाही अधिक प्रमाणात डेल्टा व्हेरीएंट आढळून आला आहे. तर 32% रुग्णांमध्ये ओमायक्रोन संक्रमित आढळले आहेत. याच पत्रात व्यास यांनी पुढे म्हटले आहे की, नोव्हेंबर 2021 पासून आतापर्यंत सुमारे 4265 रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 4201 नमुन्यांचे अवाल प्रसिद्ध झाले. यात असे स्पष्ट झाले की, 32% म्हणजेच 1367 जणांच्या नमुन्यांमध्ये ओमायक्रोन व्हेरीएंट आढळून आला. तर जवळपास 68% नमुने डेल्टा व्हेरीएंट संक्रमित असल्याचे दिसून आले. (हेही वाचा, Coronavirus India Updates: भारतातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 15.50 लाखांवर, पाठीमागील 24 तासात 2.71 जणांना संसर्ग)

ओमायक्रोन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरीएंट प्रथम दक्षिण अफ्रिकेमध्ये आढळून आला. साधारण नोव्हेंरब 2021 मध्ये आढळून आलेला हा व्हेरीएंट पुढे जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला. या विषाणूचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात फैलाव झाल्याचे आढळले. तेव्हापासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात शेवटची माहिती हाती आली तोपर्यंत (शनिवार रात्रीपर्यंत) ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 1730 इतकी होती.तर 68% लोकांमध्ये डेल्टा व्हेरीएंट आढळून आला.