दिल्ली हिंसाचार हा तर RSS आणि भाजपचा चा पूर्वनियोजित प्लॅन: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar (Photo Credit: Facebook)

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरुद्ध मागील काही काळात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं होतं. यावरून केंद्र सरकार, दिल्ली सरकार यांच्यावर अनेकांनी बोट उचललं होतं मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिल्लीची दंगल (Delhi Violence)  ही पूर्वनियोजित होती असे म्हणत हा हिंसाचार राष्ट्रीय स्वयंसेवा संघाने (RSS) घडवून आणल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अलीकडेच एका अहवालानुसार, 25 लाख सैनिकांचे गणवेश विकण्यात आल्याचे म्हणताना अशा दंगली पुन्हा झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असेही आंबेडकर यांनी म्हंटले आहे. नाभिक समाजाच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ हिंदूच नव्हे तर हिंदूंचे देवही संकटात - सचिन सावंत

मटा ऑनलाईन च्या वृत्तानुसार, आंबेडकर यांनी बोलताना, "सीएएचा कोणताही धोका नसल्याचं इतर मागासवर्गीय समाजाला सांगितले जात आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बाहेरील देशातील नागरिकांना हाकलल्यावर त्यांची मालमत्ता इतर मागासवर्गात वाटून दिली जाणार असल्याचे आमिष दाखवण्यात येत आहे, मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत अपुऱ्या माहितीच्या आधारे राज्यातील मंत्री वायफळ बडबड करत आहेत असा आरोप सरकारवर लावला आहे. याबाबत सर्व छोट्या छोट्या मागासवर्गीय गटांना माहिती मिळावी म्हणून असेच मेळावे घेण्याची आपण सुरुवात केली आहे असेही आंबेडकर यांनी या सभेत सांगितले आहे.

दरम्यान, या सोबतच आंबेडकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही टीका केली. अर्थसंकल्पात 8 हजार कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही तूट 16 हजार कोटींची आहे. राज्याने दाखवलेली 8 हजार कोटींची तूट आणि केंद्राकडून मिळणारे 8 हजार कोटी अशी 16 हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष तूट असल्याचं आंबेडकर म्हणाले.