आप, शिवसंग्राम, शिवसेना आणि आता सेनेतील फूटीनंतर शिंदेगटाच्या वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद यांचा आज 'बाळासाहेबांची शिवसेना' (Balasahebanchi ShivSena) गटामध्ये प्रवेश होणार आहे. ठाण्यात टेंभीनाका (Tenbhi Naka) वर हा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. जून 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले तेव्हा या दोघांनीही एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करेन असं दीपाली सय्यद (Deepali Sayyad) म्हणाल्या होत्या. पण आता त्यांनीही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपाली सय्यद या नृत्यांगणा आणि अभिनेत्री आहेत. कलाक्षेत्रासोबत त्यांनी राजकारणामध्येही आपलं नशीब आजमाजवलं आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती पण त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. त्यानंतर शिवसेनेची बाजू आक्रमकतेने मांडत त्या अनेकदा चर्चेमध्ये राहिल्या. मात्र सेनेत फूट पडल्यानंतर आपण बाहेर पडल्याची काही दिवसांपूर्वी घोषणा करताना रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
दीपाली सय्यद यांनी संजय राऊत यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी टीका केली. तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत असल्याची त्या म्हणाल्या होत्या. आज शिंदेगटात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्या पुढील राजकीय भूमिका मांडणार आहेत. हे देखील नक्की वाचा: खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांची शिवसेना गटात दाखल होताच उद्धव ठाकरेंकडून त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी; अमोल कीर्तीकर उपनेते पदावर कायम .
दरम्यान भाजपाकडून दीपाली सय्यद यांच्या नावाला विरोध असल्याची चर्चा होती. त्यांनी शिवसेनेत असताना नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यामुळे त्यांनी माफी मागून आणि भाजपा कार्यकर्त्यांविरूद्धच्या तक्रारी मागे घेऊन यावं अशा अटी-शर्थी ठेवल्या असल्याचंही काही मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.