प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या (Reliance Foundation Hospital) रिसेप्शन काऊंटवर फोनच्या माध्यमातून ही धमकी आली आहे. धमकीचा फोन येताच हॉस्पीटलने तातडीने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एकाच फोन नंबरवरुन एकापेक्षा अधिक वेळा धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. एकाच फोनवरुन तब्बल 8 वेळा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या आधीही अंबानी कुटुंबीयांना धमकी मिळाली आहे. या वेळी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डिस्ल्पे नंबरवर धमकीचा फोन आला आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी दिली आहे. ज्यामुळे हॉस्पिटलमधील लोकांनी तातडीने DB मार्ग पोलीसस्टेशनमध्ये तक्रार दिली. ज्या फोनवरुन धमकी आली त्या फोन नंबरची पोलीस पडताळणी करत आहेत. (हेही वाचा, Mukesh Ambani Resign: मुकेश अंबानी यांचा रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा; मुलगा आकाश अंबानी याच्यावर सोपवली जबाबदारी .)
फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी देताना म्हटले की, पुढच्या तीन तासात अंबानी कुटंबाचा खात्मा करण्यात येईल. या धमकीनंतर मुंबई पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणी विविध कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच, पोलिसांनी कसून चौकशी केली असून, जबाबही नोंदवले जात आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी म्हटले की, एकूण आठ वेळा आम्हाला धमकीचे फोन आले. सुरुवातीला आम्हाला वाटले कोणीतरी गंमत करत असेल. परंतू, वारंवार फोन आल्यानंतर आम्ही फोनची दखल गांभीर्याने घेतली. त्यामुळे आम्ही या घटनेची माहिती पोलिसांना दिली.