Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Kolhapur: घरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने (Power Outage) व्हेंटिलेटर (Ventilator) वर असलेल्या कोल्हापूरातील रुग्णाचा मृत्यू (Kolhapur Patient Die) झाल्याची घटना समोर आली आहे. फुफ्फुसाच्या आजारावर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एका 38 वर्षीय व्यक्तीला त्याच्या घरी व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अचानक वीज पुरवाठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटर बंद पडले आणि या रुग्णाचा मृत्यू झाला. पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उचगाव गावात (Uchgaon Village) गुरुवारी रात्री ही घटना घडली.

उचगाव येथील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्ण अमेश काळे हे गेल्या काही वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना त्यांच्या घरी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, वीज वितरण कंपनीने बिल न भरल्याचा आरोप करत 30 मे रोजी या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अमेशच्या कुटुंबाने त्याच्या उपचारासाठी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली. (हेही वाचा - Hyderabad: मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आमदाराचा मुलगा पोलिसांच्या रडारवर)

दरम्यान, गुरुवारी रात्री पावसामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरने काम करणे बंद केले. परिणामी रुग्णाचा मृत्यू झाला, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेला दुजोरा देताना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, “विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची पोलीस विभाग चौकशी करत आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे संतप्त कुटुंबीय आणि नातेवाईक स्थानिक सरकारी रुग्णालयाबाहेर जमले. मृत अमेशच्या कुटुंबियांनी वीज वितरण कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला, असेही अधिकाऱ्याने सांगितले.