Children Drowned | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्यात असलेल्या सेलू येथे शाळकरी दोन मुलांचा शेलू नदीत बुडून मृत्यू (School Children Drowned) झाला. सेलू (Selu) येथील तीन मित्र शेलू नदीत (Shelu River) आंघोळ करण्यासठी बुधवारी (23 सप्टेंबर) दुपारी गेले होते. नदीत आंघोळ करणे हे तिन्ही मित्रांच्या जीवावर बेतले. यातील एकाचे प्राण वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, उर्वरीत दोघांचा मृत्यू झाला. शाळेतील या सवंगड्यांची मैत्री जीवनाच्या अखेरपर्यंत कायम राहिली. नियतीने त्यांचे प्राण घेतले पण तिला त्यांच्या दोस्तीचा बंध तोडता आला नाही. दोन्ही मित्रांची एकत्रच अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी गावकऱ्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. अवघ्या गावालाच हुंदाक फुटल्याचे चित्र निर्माण झाले.

आंघोळ बेतली जीवावर

प्राप्त माहितीनुसार, ओम काशीनाथ भालेराव (वय 13, इयत्ता सातवी) आणि धीरज आप्पा खैरनार (वय 14, इयत्ता आठवी), वैभव वसंत वाघ (वय 12) असे तीन मित्र शेलू नदीत आंघोळ करण्यासाठी गेले. नदी काठावर आंघोळ करत असताना हे तिघेही पाय घसरुन नतीपात्रात पडले. तिघांनाही निटसे पोहता येत नव्हते. नदीपात्रातील पाण्याला प्रवाह असल्याने तिघे वाहून जाऊ लागले. आरडाओरडा करु लागले. (हेही वाचा, Mumbai Thane Rain Update: मुंंबई, ठाणे, नवी मुंंबई मध्ये आज पावसाची विश्रांंती, संध्याकाळी बरसतील हलक्या सरी- IMD)

दोघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

दरम्यान, तीन मुले नदीच्या पाण्यात पडल्याचे नदीकाठावरील गावकऱ्यांच्या लक्षात आले. या वेळी ग्रामस्थांनी तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, तोपर्यंत काहीसा उशीर झाला होता. गावकऱ्यांना प्रयत्न करुन तीघांना वाचवेपर्यंत ओम भालेराव आणि धीरज खैरनार या दोन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, वैभव वाघ याचे प्राण वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले.

दोन मित्रांची अंत्ययात्रा एकत्र

ओम भालेराव आणि धीरज खैरनार या मुलांचे मृतदेह ग्रामस्थ अरुण मांगू माळी आणि बाळू भालेराव यांनी पाण्याबाहेर काढले. दोघांचेही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविण्यात आले. शवविच्छेन केल्यानंतर गावकऱ्यांनी सायंकाळी सहाच्या (23 सप्टेंबर) सुमारास दोघांवर अमरधाममध्ये येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मित्रांची अंत्ययात्रा एकत्रच काढण्यात आली. या वेळी गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

जीवनाचा आधारच गेला

दोन्ही मुले ही सामान्य घरातील होती. त्यांचे आईवडील मोलमजूरी करुन उतरनिर्वाह करतात. त्यात ओम भालेराव हा त्याच्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा होता. आमच्या जीवनाचा आधारच गेला, अशा शब्दात यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, नाशिक जिल्हायात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या तीन वेगवेगळ्या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. यातील एक घटना सेलू (ता. चांदवड) गावात घडली. दुसरी वडांगळी येथे घडली. वडांगळी येथेही देवनदीत एक तरुण वाहून गेला. तर आणखीही एक घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्याचा तपशील अद्याप मिळू शकला नाही.