उल्हासनगर (Ulhasnagar) येथील भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा (Jaykumar Sharma) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी (14 मार्च) मध्यरात्री ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जयकुमार शर्मा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उल्हासनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार शर्मा यांच्या मालकीचे घर आहे. यात सध्या ते राहत नसून ते घर त्यांनी भाड्याने दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाडेकरू झोपलेले असताना काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या दरवाजा वाजवून त्यांना त्रास देत होते. यासंदर्भात भाडेकरूने जयकुमार यांना सांगितले होते. परंतु, कामात असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, शनिवारी रात्रीही कोणीतरी दरवाजा वाजवत असल्याची माहिती भाडेकरूने जयकुमार यांना दिली. यावेळी घराच्या गल्लीत काही लोक अंधारात दबा धरून बसले होते. जयकुमार यांनी त्यांना कोण आहे? अशी विचारणा केली. याचदरम्यान, जयकुमार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने हल्ला केला. हे देखील वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
या हल्लात गंभीर जखमी झालेल्या जयकुमार यांनी तातडीने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठले. परंतु, या हल्लात जयकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
जयकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. जयकुमार यांच्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.