Janta Curfew: लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही- अजित पवार
Ajit Pawar (Photo Credits: Twitter)

भारतावर आलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण संकटावर मात करण्यासाठी देशभरात भारत सरकारकडून ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) ला देशवासियांशी भरघोस प्रतिसाद दिला. त्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी मिळून टाळ्या, थाळ्यांचा नाद केला. यावेळी काही नागरिकांनी घरातील बाल्कनीमध्ये, खिडकीजवळ, दरवाज्याजवळ येऊन हा घंटानाद केला. मात्र काहींनी रस्त्यावर उतरून गर्दी करून हा घंटानाद केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण देशभरात लोक घंटानाद करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी काही लोकांनी रस्त्यावर उतरुन गर्दी करत घंटानाद केला. 'लोकांकडून हे अपेक्षित नसून असे एकत्र येऊन गर्दी करणे योग्य नाही', असे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी या कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अजित पवारांनी आभार मानले मात्र लोकांनी केलेल्या गर्दीवर नाराजीही व्यक्त केली.

पाहा अजित पवारांचे ट्विट

लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणं टाळण्याची गरज आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च रोजी, पीएम नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळावा असे सांगितले होते. या काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे असे सांगण्यात आले होते. तसेच सायंकाळी 5 वाजता डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी अशा लोकांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच मिनिटे घराच्या दरवाजात, खिडकीत उभे राहून आभार मानावेत असेही सांगण्यात आले होते.