Davos World Economic Forum 2024: स्वित्झर्लंडच्या दावोस येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद; महाराष्ट्रातून CM Eknath Shinde यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ होणार सहभागी
CM Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

Davos World Economic Forum 2024: स्वित्झर्लंडमध्ये दावोस (Davos) येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum) होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आज आढावा घेण्यात आला. दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा, परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गतवर्षी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. ते आता कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, ही समाधानाची बाब आहे. यंदाही दावोसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करण्याची संधी आहे. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत–ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रातील उद्योग येतील. त्याचबरोबर कृषि-औद्योगिक, कृषि आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘महाराष्ट्रात उद्योगांसाठीची ‘इकोसिस्टिम’ अत्यंत उत्तम आहे, हे उद्योग जगतालाही माहीत आहे. त्यामुळे या परिषदेच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, या गुंतवणूक परिषदेत जगभरातील आणि विविध क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. या परिषदेत गुंतवणूक करार आणि वाटाघाटी यासाठी विशेष संधी आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. (हेही वाचा: Employment Opportunities In Israel: इस्राईलमध्ये बांधकाम कामगारांसाठी रोजगाराच्या संधी; अर्ज मागविण्याची कार्यवाही सुरु, जाणून घ्या सविस्तर)

या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना ‘राऊंड टेबल’ चर्चेत विचार मांडण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, उद्योग व व्यापार विषयक मंत्री, अन्य देशांची शिष्टमंडळ तसेच जगातील विविध क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे प्रमुख, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह, उद्योग मंत्री सामंत आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार आहेत. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.