धक्कादायक! वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्याने ठाण्यात डान्सर युवतीचा मृत्यू; FDA ने सुरु केला तपास
मेघना देवगडकर (Photo Credit Facebook)

आजकाल स्लिम असणे, बारीक असणे हे तरुणाई समोरील फार मोठे ध्येय बनले आहे. सध्या जणू काही बारीक कंबर असणे हे सुंदरतेचे, आकर्षक असल्याचे लक्षणच मानले गेले आहे. याच अट्टाहासामधून अनेक तरुण-तरुणी शॉर्टकट अवलंबतात, यामधून अनेक अपघात घडल्याचे प्रकार आपण ऐकले असतील. मात्र आता यामुळे एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) येथे वजन कमी करण्याची गोळी घेतल्याच्या अवघ्या काही तासांनी, एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मेघना देवगडकर असे या तरुणीचे नाव असून, ती एक डान्सर होती. महत्वाचे म्हणजे ती एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होती.

मेघनाने बंदी घातलेल्या ड्रिनट्रोफिनॉलचा डोस घेतला आणि अवघ्या 15 तासांनंतर तिचा मृत्यू झाला. सोमवारी मेघना देवगडकरने जिममधील वर्कआउट होण्यापूर्वी हा शॉट घेतला होता. हा डोस घेतल्यानंतर मेघनाने तो तोंडातून बाहेर फेकण्यास सुरुवातही केली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, त्यानंतर तिला जनरल प्रॅक्टिशनरकडे नेण्यात आले. पुढे तिला लाइफलाईन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून तिला शीव रुग्णालयात रेफर केले.

मेघनाला सियोनमधील आयसीयूमध्ये हलविण्यात आले, पण तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, बंदी असलेली गोळी घेतल्यानंतर मेघनाला हायपरथर्मियाचा त्रास झाला, ज्यामुळे तिच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले. यामुळे तिच्या हृदयाचा ठोका आणि रक्तदाब तीव्र प्रमाणात वाढला. (हेही वाचा: 40 शी नंतर वजन कमी करण्यासाठी खास '5' टिप्स !)

या घटनेमुळे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपास सुरू केला आहे. याबाबत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघनाने बंदी घातलेले औषध कसे काय मिळवले, याचा तपास सुरू झाला आहे. ही औषधे कोणी आणि अजून कोणाला विकली आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जिममधील काही कर्मचार्‍यांसोबत चौकशी सुरु केली आहे.