Dalai Lama congratulates ISRO: भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडली. जगभरात भारताचे कौतुक झाले. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि वैज्ञानिकांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव आणि अभिनंदन होत आहे. तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी देखील इस्रो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताचीचंद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. दलाई लामा यांनी याबाबतएक अधिकृत निवेदन प्रसिद्धीस दिले. या निवेदानत त्यांनी म्हटले आहे की, चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) यशस्वी लँडिंग ही भारतातील लोकांसाठी महत्त्वाची आणि आदरयुक्त घटना आहे. भारताने पूर्वीपासूनच वैज्ञानिक बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले आहे.
दलाई लामा यांनी म्हटले आहे की, इस्त्रोच्या वैज्ञानिक आणि अभ्यासकांनी भारताची वैज्ञानिक आणि तांत्रिक परिपक्वता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने मिशनवर काम केले. मी इस्रोचे प्रमुख आणि त्यांच्या कार्यसंघाचे त्यांच्या समर्पणाबद्दल कौतुक करू इच्छितो. ज्यामुळे हे मिशन शक्य झाले आहे. त्यांनी भारताची वैज्ञानिक आणि तांत्रिक परिपक्वता दर्शविली आहे. भारताचा सर्वात जास्त काळ राहणारा पाहुणा म्हणून, मला या महान विजयाचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.
मला विश्वास आहे की, भारतीय वैज्ञानिक संशोधन संस्था पुढील वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये आपली नेतृत्व भूमिका मजबूत करत राहील. माझी प्रार्थना आणि शुभेच्छा देऊन भारतीयांसोबत असल्याचेही लामा यांनी म्हटले. चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने अंतराळात 40 दिवसांच्या प्रवासानंतर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण कक्षेत प्रवेश केला. चंद्र लँडिंग मोहीम यशस्वीपणे पार पाडणारे अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरला आहे.