राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आण विधानसभेतील गटनेते जयंती पाटील यांचे हिवाळी अधिवेशन कालावधीत सरकारकडून निलंबन करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकासआघडी विधिमंडलात आणि विधिमंडळाबाहेरही आक्रमक झाली आहे. हा सर्व गदारोळ सुरु असतानाच आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनीही ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमधून रोहित पवार यांनी दादा कोंडके (Dada Kondke) यांची काढत चक्क त्यांच्या चित्रपटांच्या नावांतूनच खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ज्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
रोहीत पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये दादा कोंडके यांच्या विविध चित्रपटांची नावे आहे. या चित्रपटांची संगतीही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे लावली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर.. 'मला घेऊन चला' म्हणून 'पळवा पळवी' करत 'तुमचं आमचं जमलं' म्हणत 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं! पण सध्या 'खोल दे मेरी जुबान' असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय..' (हेही वाचा, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, बंद दाराआड चर्चा, तपशील गुलदस्त्यात)
दादा कोंडके हे उत्तम अभिनेते, शाहीर आणि दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक गाणीही गायली आहेत. त्यांची गाणी, चित्रपटातील संवाद आणि गाणीही अत्यंत खुमासदार असतात. जनमानसातही त्यांच्या चित्रपटांचा आणि संवादाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे रोहीत पवार यांनी हाच धागा पकडून राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ट्विट
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर...
'मला घेऊन चला' म्हणून 'पळवा पळवी' करत 'तुमचं आमचं जमलं' म्हणत 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं!
पण सध्या 'खोल दे मेरी जुबान' असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय... pic.twitter.com/sYvv8qm4Pf
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2022
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सवता सुभा मांडत ज्या पद्धतीने भाजपशी हातमिळवणी केली आणि सत्तास्थापन केली त्यावरुन पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. रोहीत पवार यांचे ट्विट पाहता सोशल मीडयात महाविकासआघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.