मॅट्रीमोनीअल (Matrimonial Platform) साईट्स वरुन लग्नाचे आमिष दाखवत पुणे येथील एका महिला आयटी अभियंत्याची (IT Engineer) फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून (Cyber Crime In Pimpri-Chinchwad) फसवणूक झालेल्या अभियंत्याने या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार या अभियंत्याची 91,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. ही अभियंता पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात राहणारी आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 60 (सी) नुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेली महिला अभियंता आणि आरोपी यांची मॅट्रीमोनीअल साईट्सवरुन ओळख झाली होती. आरोपीने महिला अभियंत्याला सांगितले की, त्याची आई आजारी आहे. आईच्या उपचारासाठी त्याला काही पैशांची गरज आहे. पैसे दिल्यावर आणि आईवरील उपचार पूर्ण झाल्यावर आपण दोघे विवाह करु असेही या तरुणाने संबंधित महिला अभियंत्याला सांगितले. त्यानंतर महिला अभियंत्याने कर्नाटकातील उडुपी भागातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात ₹91,000 ट्रान्सफर केले. मात्र, त्या व्यक्तीने आपली खोटी ओळख सांगितल्याचे तिच्या लक्षात आले. (हेही वाचा, Cyber Crime: महिलांविरोधात गेल्या तीन वर्षात 36,463 सायबर गुन्ह्याची नोंद)
अभियंता महिलेने आरोपीला त्याच्या खोट्या नावाबाबत विचारले असता त्याने तिच्यासोबत भांडण केले. तसेच, विवाह करण्याचे अश्वासन मागे घेत विवाहसुद्धा रद्द केला. भांडणानंतर त्याने तिचे पैसे परत करण्याची मागणी फेटाळून लावत, तिला टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा व्यवहार झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, मेट्रोमोनिअल साईट्सवर 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे प्रोफाईल जुळले. त्यानंतर महिलेने संबंधित तरुणाच्या खात्यावर 26 नोव्हेंबर रोजी पैसै जमा केले. त्यानंतर त्याने तिच्याशी भांडण केले. सांगवी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विजय भोंगले यांनी सांगितले की, आरोपी हा परराज्यात असल्याचा संशय आहे. आम्ही तपास करत आहोत.