farmers | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र सरकारने गारपीट (Hailstorm) आणि अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत (Crop Loss) भरपाई जाहीर केली आहे. सरकारने ही रक्कम कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी जाहीर केली आहे. मार्च, एप्रिल आणि मे 2021 मध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी 122.26 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. ज्या शेतीचे 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज् आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करून, एकूण 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा:  ट्रान्स हार्बर मार्गावर पुन्हा एकदा उद्यापासून वातानुकूलित लोकल ट्रेन्स धावणार)

गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी कोकण विभागासाठी 29 लाख 30 हजार रुपये, पुणे विभागासाठी 3 कोटी 16 लाख 75 हजार रुपये, नाशिक विभागासाठी 59 कोटी 36 लाख 34 हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी 15 कोटी 51 लाख 54 हजार रुपये, अमरावती विभागासाठी 38 कोटी 87 लाख 56 हजार रुपये, नागपूर विभागासाठी 5 कोटी 4 लाख 81 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.