महाराष्ट्र: COVID19 च्या पार्श्वभुमीवर वसई- विरार येथे दुकांनाच्या वेळांवर निर्बंध
प्रतिकात्मक फोटो (Phoro Credits-Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. याच दरम्यान आता वसई-विरार (Vasai-Virar) महापालिकेने सुद्धा कोरोनाचे एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. वसई-विरार येथे एकाच दिवसात 491 कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली तर 2 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

वसई-विरार मध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने दुकाने रात्री 10 ऐवजी संध्याकाळी 5 वाजता बंद करावेत असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा 4628 वर पोहचला असून एकूण 119 जणांचा बळी गेला आहे. तर वाळीव येथे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 1 हजार बेड्सची उपलब्धता असलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णालयात जवळजवळ 150 ऑक्सिजनयुक्त अशा बेड्सची सोय करुन देण्यात आली आहे.(COVID19: रुग्णांकडून उपचारांसाठी अतिरिक्त पैसे आकरल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल; मुंबई महानगरपालिकेची कारवाई)

दरम्यान, राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या नियमात हळूहळू शिथिलता आणण्यात येत आहे. नियम शिथिल करण्यासोबत काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली आहे. परंतु नियम आणि अटींचे दुकानांसह नागरिकांनी पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या एकूणच परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास रुग्णांचा आकडा 186626 वर पोहचला असून 8178 जणांचा बळी गेला आहे.